मिळकत करातील वाढ सर्वसाधारण सभेने फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता कराची आकारणी करण्यासाठी निश्चित केलेल्या वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे एप्रिलनंतर नव्याने कर आकारणी होणाऱ्या सदनिकांच्या मिळकतकरात वाढ होणार आहे.
महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात ११ टक्क्यांची वाढ प्रस्तावित केली होती. मात्र, पालिकेतील सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षाने यास विरोध करीत ती फेटाळून लावली होती. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला होता.
त्यावर आता महापालिका प्रशासनाने मिळकतकराची आकारणी करण्यासाठी जो दर असतो, त्याच्या म्हणजे वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दर वाढविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. त्यांच्या अधिकारात येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू करणार आहे.