गंज पेठेत गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यू

पुण्याच्या गंज पेठ परिसरात गुरुवारी रात्री भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत गोडाऊनमध्ये झोपलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. शिवकांत कुमार (वय 28, रा. मूळ. उत्तरप्रदेश, सध्या, मासेआळी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गंज पेठ परिसरात आर के स्क्रॅप सेंटर हे भंगार मालाचे दुकान आणि गोडाऊन आहे. याच दुकानात मयत शिवकांत कुमार हा काम करत होता. गुरुवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या कामगाराच्या ओरडण्याचा आवाज आल्याने काही नागरिकांनी येऊन पाहिले परंतु तेव्हा आग दिसली नाही. त्यानंतर काही वेळात त्याठिकाणी आगीचा भडका उडाला.

याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली असता एक व्यक्ती भाजलेल्या अवस्थेत या ठिकाणी आढळून आले. त्यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, जवान राहुल नलावडे, सपकाळ, देवकुळे, देवदूतचे शिर्के, कार्ले या जवान यांनी ही आग आटोक्यात आणत कामगिरी केली आहे.

Leave a Comment