जल्लोष भोवला, उपमहापौरांच्या मुलासह 70 जणांवर गुन्हा

उपमहापौरपदी निवड झाल्यानंतरचा जल्लोष साजरा करणे उपमहापौर हिराबाई घुले यांच्या चिरंजीवाला चांगलाच भोवला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौर घुले यांच्या चिरंजीवासह 60 ते 70 जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल केलेल्या उपमहापौरांच्या मुलाचे नाव आहे. ते महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. त्यांच्यासह त्यांच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सुरक्षा परिवेक्षक दत्तात्रय बारकु भोर (वय 60, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच पिंपरी – चिंचवड पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. 23 मार्च रोजी हिराबाई घुले यांची शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर उपमहापौरांचे चिरंजीव चेतन घुले हे त्यांच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले. गर्दी करून घोषणाबाजी केली. त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment