अधिकृत पार्किंग नसतानाही खोटे पावती पुस्तक छापून पार्किंगच्या नावाखाली हजारो रुपये वसूल केल्याप्रकरणी बंडु आण्णा आंदेकर याच्यासह दोघांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंडु आण्णा आंदेकर (रा. नाना पेठ, पुणे) आणि सागर थोपटे (नाना पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गौरव सिद्धू सारवाड (वय 24, राहणार संभाजीनगर धनकवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी नाना पेठेत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा या नावाने अनधिकृत वाहनतळ उभारले आहे. त्यांनी खोटे पावती पुस्तक छापून फिर्यादी कडून पार्किंगच्या नावाखाली दमदाटी करून दोन वेळा प्रत्येकी 10 रुपये वसूल केले.
याशिवाय या ठिकाणी दररोज साडेतीनशे ते चारशे रिक्षा व दुचाकी गाड्या पार्क होतात. या वाहनचालकांना फसवून व धमकावून त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली दररोज साडेतीन हजार ते चार हजार रुपये रक्कम खंडणी स्वरूपात वसूल केली जात आहे. अशा प्रकारे वरील आरोपी एका महिन्यात साधारण एक लाख रुपये रक्कम सामान्य नागरिकांकडून खंडणी स्वरूपात वसूल करत असल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.